२० ऑगस्टच्या महामोर्चासाठी मातंग समाजाची गाव-वाडी-वस्तीवर जनजागृती; लाखोंच्या उपस्थितीचे आवाहन
धाराशिव | लोकविचार
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी २० ऑगस्ट २०२६ रोजी धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर मातंग समाज बांधवांकडून जिल्हाभर जोरदार जनजागृती सुरू आहे. जिल्ह्यातील गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यांवर बैठका घेऊन समाजबांधवांना महामोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
चिखली, तेरखेडा, पांगरी, तेर, चिंचोली, रामेश्वर, सुकटा, घाटनांदूर, इट, राजुरी, सांजा, मसा, खंडेश्वरी, मांडवा, वाशी, सिंद, नळी, वडगाव, तिंत्रज, जळकोट, उमरगा यांसह जिल्हाभरात समाजबांधवांकडून बैठका व जनजागृती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे महिलाही उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभागी होत असून, घराघरांत जाऊन महामोर्चाची माहिती देत आहेत.
भूम तालुक्यातील मौजे नळी, वडगाव व तिंत्रज येथे महामोर्चाच्या अनुषंगाने बैठका घेण्यात आल्या. यावेळी २० ऑगस्ट रोजी धाराशिव येथे होणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकींना गावांतील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, समाजातील प्रमुख व्यक्तींनी जिल्ह्यातील गाव खेड्यातील घर ते घर जाऊन महामोर्चाचा प्रचार व प्रसार करण्यात येणार असून, समाजातील प्रत्येक घटकाने या आंदोलनात सहभागी व्हावे, यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. उपवर्गीकरणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी २० ऑगस्ट रोजी धाराशिवमध्ये होणारा महामोर्चा ऐतिहासिक करण्याचा निर्धार समाजबांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











