गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
कळंब | लोकविचार
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भाटसांगवी पाटीजवळ कारवाई करत गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एका आरोपीस जेरबंद केले. ही कारवाई १९ सप्टेंबर रोजी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांचे पथक कळंब परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी भाटसांगवी पाटीजवळ एक इसम गावठी पिस्टल घेऊन थांबलेला असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहितीची खातरजमा करून पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत नवनाथ उर्फ बालाजी बब्रुवान काळे (रा. भाटसांगवी, ता. कळंब) यास ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये त्याच्याकडे गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस, असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्यास कळंब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि अमोल मोरे यांच्यासह पोलीस अंमलदार अमोल चव्हाण, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, चापोअं विनायक दहीहांडे व आरसीपी-४ पथकाने केली.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











