नळदुर्गमध्ये रेशन धान्याच्या काळाबाजाराचा संशय; जप्त टेम्पो सोडण्याच्या हालचाली?
नळदुर्ग लोकविचार
शहरातील नगरपालिका कार्यालयासमोरील एका गोडाऊनमधून शासकीय रेशन धान्य काळाबाजारात विक्रीसाठी नेले जात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी काल सायंकाळी MH 13 EP 0828 क्रमांकाचा टेम्पो पकडल्याची माहिती आहे. संबंधित वाहन पोलिस ठाण्यात आणून ठेवण्यात आले असून, अद्याप त्यावर गुन्हा दाखल झालेला नसल्याचे समोर येत आहे.
सूत्रांनि दिलेल्या माहितीनुसार, गोडाऊनमधून (पोती बदलून) धान्य टेम्पोत भरले जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र, कारवाईनंतर वाहन पोलिस ठाण्यात असतानाही संबंधित चालक व गोडाऊन मालकाला सवलत देऊन प्रकरणातून बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा नळदुर्ग शहरात रंगली आहे.
महसूल (पुरवठा) विभागामार्फत सदरील मालाशी आपला संबंध नसल्याचे पत्र घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे जप्त केलेल्या धान्याचा स्रोत काय? ते कुठे नेण्यात येणार होते? संबंधित गोडाऊन कोणाचे? याची सखोल चौकशी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नळदुर्ग परिसरातून पोते बदलून (बारदाना) शासकीय धान्य काळाबाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीही झाल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. गोरगरीब लाभार्थ्यांच्या हक्काचे धान्य अशा प्रकारे वळविले जात असेल तर त्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्याची मागणी होत आहे.
विशेष म्हणजे, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारासाठीच्या धान्याबाबतही गैरप्रकार होत असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या आरोपांची महसूल प्रशासन, संबंधित पुरवठा विभाग, शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.
दरम्यान, जप्त केलेला टेम्पो अद्याप पोलिस ठाण्यातच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, गुन्हा दाखल करण्याऐवजी संबंधितांना सवलत देऊन वाहन सोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पोलीस अधीक्षक रितू खोखर या प्रकरणाची दखल घेऊन स्वतंत्र चौकशीचे आदेश देणार का? जप्त धान्याचा संपूर्ण तपास करून काळाबाजारामागील साखळी उघड होणार का, की केवळ कागदोपत्री कारवाई करून प्रकरणावर पडदा टाकला जाणार, याकडे धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











