धाराशिवमध्ये ‘सह्याद्री देवराई’चा महत्त्वाकांक्षी उपक्रम; पाच देवरायांची निर्मिती होणार, CSR निधीतून कोट्यवधींची गुंतवणूक
मुंबई/धाराशिव | लोकविचार
धाराशिव जिल्ह्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात पाच नवीन देवरायांची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रत्येकी पाच एकर जागेवर विकसित होणाऱ्या या देवरायांसाठी नामांकित उद्योग समूहांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून आर्थिक सहभाग घेतला जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
या संदर्भात मुंबई येथे आयोजित बैठकीत उपक्रमाच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस ‘सह्याद्री देवराई’ संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच टाटा मोटर्स, रिलायन्स फाउंडेशन, अशोक लेलँड, इंडियन ऑईल आणि टोयोटा या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, प्रत्येक देवराईमध्ये सुमारे २ हजार ५०० देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्षांचे केवळ रोपणच नव्हे तर पुढील पाच वर्षे नियमित संगोपन आणि संवर्धन केले जाणार आहे. पर्यावरणीय समतोल राखणे, जैवविविधता वाढविणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
सरनाईक यांनी पुढे सांगितले की, एका देवराईच्या संवर्धनासाठी दरवर्षी सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून पाच वर्षांच्या कालावधीत हा खर्च अंदाजे अडीच कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. अशा प्रकारे पाच देवरायांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक जागा निश्चित करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि वन विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.
‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांत पर्यावरण संवर्धनाचे यशस्वी प्रयोग राबविण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील हा उपक्रम देखील पर्यावरणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. औद्योगिक क्षेत्र आणि प्रशासन यांच्या संयुक्त सहभागातून उभारल्या जाणाऱ्या या देवराया भविष्यात जिल्ह्याच्या हरित विकासाला नवी दिशा देणार आहेत.
जिल्ह्यात वाढते तापमान, घटणारी वृक्षसंख्या आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, पर्यावरण संवर्धनासाठी शासन, उद्योग समूह आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











