पवनचक्कीचे साहित्य चोरणाऱ्या सराईत टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; चौघे ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल जप्त
धाराशिव लोकविचार
पवनचक्कीचे साहित्य चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, या प्रकरणात चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांकडून पवनचक्कीचे कॉपर केबल वायर, कॉपर रॉड, तार तसेच गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप असा एकूण ४ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे पवनचक्की साहित्य चोरीच्या एकूण चार गुन्ह्यांचा उलगडा झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे.
दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या कामासाठी रवाना झाले होते. त्यावेळी पेट्रोलिंगदरम्यान पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अनसुरडा शिवारातील फॉरेस्ट परिसरात पवनचक्कीचे पॉईंटवरून चोरी करणारी टोळी दाट झाडीमध्ये थांबली आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने फॉरेस्टच्या जवळ जाऊन वाहन जवळपास थांबवले. त्यानंतर पायी चालत जात असताना पोलिसांच्या निदर्शनास काही इसम पडले. पोलिसांना पाहताच त्यांनी दाट झाडीच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस पथकाने त्यांचा पाठलाग करून अत्यंत शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याविरुद्ध धाराशिव जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरही चोरीचे गुन्हे असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. पवनचक्कीचे साहित्य चोरीसंदर्भात चौकशी केली असता, त्यापैकी नंदू रामा शिंदे, रा. खामकरवाडी याने खामकरवाडी येथील त्याच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी पवनचक्कीचे साहित्य असल्याचे पोलिसांना सांगितले.
त्यानुसार पोलिसांनी खामकरवाडी येथे जाऊन पाहणी केली असता तेथे कॉपर केबल वायर, कॉपर रॉड, तार आदी साहित्य आढळून आले. हे साहित्य ताब्यात घेऊन त्याबाबत पोलिसांनी पुढील चौकशी केली.
या प्रकरणात पोलिसांनी अनिल नाना काळे (वय ४०, रा. मस्ता), नंदू रामा शिंदे (वय ४२, रा. खामकरवाडी), बब्बल उर्फ राम शिवाजी शिंदे (वय २९, रा. खामकरवाडी) आणि शाम उर्फ बाबा शंकर शिंदे (वय २८, रा. खामकरवाडी) यांना ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
या संशयितांकडून पवनचक्कीचे कॉपर केबल वायर, कॉपर रॉड, तार तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो जीप असा एकूण ४ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईतून पवनचक्की साहित्य चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके तसेच पोलीस कर्मचारी विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गाडेकर, पोलीस नाईक बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, चापोहे/मेहबूब अरब, प्रकाश बोईनवाड व रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली.
पवनचक्की प्रकल्पांवरील महागडे साहित्य चोरीला जाण्याच्या घटनांमुळे संबंधित कंपन्या व प्रकल्प व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा चोरीच्या घटनांमागील संपूर्ण साखळीचा तपास करून आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


