दोन महिन्यांपासून पगार रखडला; आश्रमशाळा शिक्षकांचा संताप अनावरमुख्यमंत्र्यांना निवेदन; १५ मे रोजी आंदोलनाचा इशारा
धाराशिव : जिल्ह्यातील आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचा पगार दोन महिन्यांपासून रखडल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशीही मार्च महिन्याचा पगार न मिळाल्याने शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या संदर्भात शिक्षकांनी मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून आपली व्यथा मांडली असून, मार्फत जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडेही निवेदन सादर करण्यात आले आहे. संबंधित निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी बँका व पतसंस्थांकडून २० ते २५ लाखांपर्यंत गृहकर्ज तसेच मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतले आहे. मात्र, पगार उशिरा मिळाल्यामुळे त्यांना दुप्पट व्याजाचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन खर्च भागवताना शिक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित विभागाकडून निधीअभावी वेतन रखडल्याचे कारण देण्यात येत असले, तरी हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक वेळा निवेदने देऊनही प्रश्न मार्गी लागला नसल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून दरमहा एक तारखेपर्यंत नियमित वेतन देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, मागणी मान्य न झाल्यास १५ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.
सर्वसामान्य लोकविचार संपादक अमजद सय्यद 8390088786
