SIR नोंदणीत प्रभाग १८ आघाडीवर… जनतेच्या मदतीऐवजी विरोधकांचा अडथळा, बी एल ओ चे काम थांबवण्याचा विरोधकांचा निष्फळ प्रयत्न!
जनतेची सेवा करणाऱ्या नगरसेविका उजमा सबा पठाण यांच्यावर टीका करून विरोधकांनी उघड केला आपला बालिशपणा!
धाराशिव लोकविचार
मतदार यादी विशेष सघन पुनरिक्षण (SIR) हा अत्यंत संवेदनशील विषय असताना प्रभाग क्रमांक १८ मध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नोंदणी उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
नगरसेविका उजमा सबा अजहर पठाण तसेच काँग्रेस नेते अजहर खान पठाण यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या विशेष नोंदणी शिबिरामुळे शेकडो नागरिकांना एकाच ठिकाणी फॉर्म भरणे, २००२ च्या मतदार यादीत नाव शोधणे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे सोपे झाले आहे. काँग्रेस नेते अजहर खान पठाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही नागरिकांना प्रत्यक्ष मदत करून नोंदणी प्रक्रिया वेगवान केली आहे.
दरम्यान, या लोकाभिमुख उपक्रमावर काही विरोधकांकडून टीका करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जनतेच्या सोयीसाठी सुरू केलेल्या उपक्रमावर राजकारण करण्याऐवजी अशाच प्रकारचे मदत केंद्र सुरू करून नागरिकांना हातभार लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
२९ जुलैपर्यंत अंतिम मतदार यादी तयार होणार असून या कालावधीत आवश्यक नोंदणी अथवा पडताळणी न झाल्यास संबंधित मतदाराचे नाव यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
इतक्या मोठ्या प्रभागात केवळ एक बीएलओ सर्व घरांपर्यंत पोहोचू शकत नाही, अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन नागरिकांना मदत करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
प्रभाग क्रमांक १८ मध्ये नगरसेविका उजमा सबा पठाण यांनी नियुक्त केलेले सहाय्यक आणि कार्यकर्ते नागरिकांची माहिती गोळा करून फॉर्म भरून देत आहेत. त्यामुळे शहरात सर्वाधिक SIR नोंदणी या प्रभागात होत असल्याचे सांगितले जात आहे. या सकारात्मक कामामुळेच काही विरोधक अस्वस्थ होऊन सोशल मीडियावर टीका करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना नगरसेविका उजमा सबा अजहर पठाण यांनी सांगितले,
“विरोधक अजूनही पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आलेले दिसत नाहीत. आम्ही टीकेला उत्तर देण्यात वेळ घालवत नाही, आम्ही कामातून उत्तर देतो. आमच्या प्रभागातील एकही नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहोत. आम्ही एक मदत केंद्र सुरू केले आहे; विरोधकांनी टीका करण्याऐवजी दोन मदत केंद्रे सुरू करून नागरिकांची नोंदणी करून दाखवावी.”
सोशल मीडियावर करण्यात आलेल्या टीकेलाही प्रभागातील नागरिकांनी प्रत्युत्तर दिले असून अनेकांनी कमेंटद्वारे नगरसेविकांच्या उपक्रमाचे समर्थन केले आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “आमच्या प्रभागात प्रथमच इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने मतदार नोंदणीसाठी मदत केली जात आहे. फॉर्म भरण्यापासून कागदपत्रे तपासण्यापर्यंत सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने आमचे काम सोपे झाले आहे. त्यामुळे आम्ही नगरसेविका उजमा सबा पठाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. विरोधकांनी अशा विषयावर राजकारण करण्याऐवजी नागरिकांच्या हितासाठी सहकार्य करावे.”
प्रभाग क्रमांक १८ मधील SIR नोंदणी मोहिमेला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि नागरिकांचा विश्वास लक्षात घेता, जनतेच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. संवेदनशील विषयावर राजकारण करण्याऐवजी नागरिकांचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहावा, यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


