पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आठ महिन्यांचे नियोजन, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!
पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकरची धावपळ नको; आधीच उपाययोजना करा! प्रत्येक कुटुंबापर्यंत पाणी पोहोचविण्याची अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित
धाराशिव / मुंबई लोकविचार
धाराशिव जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी पुढाकार घेत मंत्रालयात बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा, पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती, आगामी उन्हाळ्यात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई आणि त्यावर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना आगामी आठ महिने पिण्याच्या पाण्याची अडचण भासू नये, यासाठी आतापासूनच काटेकोर आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजन करा. हे नियोजन केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे आणि जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत नियमित पाणी पोहोचले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पाणीपुरवठ्याचे आराखडे तयार करून प्रशासकीय स्तरावर काम पूर्ण झाल्याचे समाधान मानू नका. प्रत्यक्ष गावागावांत पाणी पोहोचते की नाही, याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकरची व्यवस्था करण्यापेक्षा संभाव्य संकट ओळखून उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन आधीच करावे, असेही त्यांनी बजावले.
या बैठकीत पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, ग्रामविकास व पंचायत राज तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विविध उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कालबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत आणि नियोजनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असल्याची खात्री करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील कोणत्याही गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, तसेच शेतकऱ्यांच्या फळबागा आणि शेतीचे नुकसान टाळता यावे, हा या नियोजनाचा मुख्य उद्देश असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य व्यवस्थापन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि शासनाच्या निधीचा प्रभावी विनियोग करून धाराशिव जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे निर्देश देत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आगामी आठ महिन्यांच्या पाणीपुरवठा नियोजनाला प्राधान्य दिले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











