मौजे गुळहाळी येथे ‘गोणपाट’ पद्धतीने सोयाबीन बीज उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक
दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
नळदुर्ग प्रतिनिधी, अझहर शेख
खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने मौजे गुळहाळी येथे शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सहाय्यक कृषी अधिकारी यु. टी. करले यांनी शेतकऱ्यांना घरच्या घरी बियाणांची उगवण क्षमता तपासण्याचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवले आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. “गोणपाट पद्धतीद्वारे बियाणांची गुणवत्ता तपासून योग्य बियाणे निवडल्यास पेरणीतील धोके कमी होऊन उत्पादन वाढण्यास मोठी मदत होते,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. पोत्याच्या वरच्या, मधल्या आणि खालच्या भागातील बियाणे एकत्र करून त्यातील सलग १०० दाणे निवडावेत. ओल्या गोणपाटावर १०-१० दाण्यांच्या १० ओळी करून मांडणी करावी व गोणपाटाची सुरळी करून सावलीच्या उबदार ठिकाणी ठेवावे. दिवसातून एक ते दोन वेळा हलके पाणी शिंपडून आवश्यक ओलावा कायम ठेवावा. चौथ्या व सातव्या दिवशी सुरळी उघडून सशक्त कोंब व मुळे आलेल्या दाण्यांची मोजणी करावी. उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास बियाणे पेरणीसाठी योग्य समजावे. क्षमता ६० ते ६९ टक्के असल्यास बियाणांचे प्रमाण ५ ते १० किलोने वाढवावे, तर ६० टक्क्यांपेक्षा कमी उगवण असल्यास असे बियाणे पेरणीसाठी वापरू नये, अन्यथा शेत विरळ राहून उत्पादनात घट होऊ शकते. सोयाबीन बियाणांना बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी प्रति किलो बियाणास ३ ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबियम व पीएसबी जिवाणू खतांची बीज प्रक्रिया करून बियाणे सावलीत सुकवावे. सोयाबीनची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल करू नये. तसेच जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होण्यासाठी किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय घाईघाईने पेरणी करू नये. घाई केल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. पेरणीपूर्वी घरच्या घरी उगवण क्षमता तपासणे ही काळाची गरज असून, यामुळे बियाणे खरेदीतील फसवणूक टाळता येते तसेच उत्पादन खर्चात मोठी बचत होते, असे आवाहन सहाय्यक कृषी अधिकारी यु. टी. करले यांनी गुळहाळी येथील शेतकऱ्यांना केले.लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शेतकरी व पाणी फाऊंडेशनचे निमंत्रक योगेश हांजगे आणि उमेद च्या महिला शेतकरी उपस्थित होते. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी बियाणांची गुणवत्ता तपासणे हाच पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.



