सुकटा मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी लोणावळ्यातून अटक
पवनचक्कीच्या वादातून लोखंडी रॉडने केली होती मारहाण; धाराशिव व पुणे जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल
भूम | लोकविचार
भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकटा शिवारात पवनचक्कीच्या वादातून फिर्यादीला अडवून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या मुख्य आरोपी सचिन उर्फ भैय्या बबन जानकर (वय ३१, रा. सुकटा, ता. भूम, जि. धाराशिव) याला भूम पोलिसांनी लोणावळा येथून शिताफीने अटक केली. वाढदिवस साजरा करण्यासाठी आरोपी लोणावळ्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा र. क्रमांक २०८/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल आहे. तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक बळीराम बंदखडके यांनी तपास पूर्ण करून निष्पन्न आरोपींविरुद्ध यापूर्वीच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, मुख्य आरोपी सचिन उर्फ भैय्या जानकर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
दरम्यान, आरोपी वाढदिवस साजरा करण्यासाठी व पार्टी करण्यासाठी लोणावळा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा भूम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल मोहिते यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकाला सूचना देऊन आरोपीला पकडण्यासाठी नियोजन केले. त्यानुसार भूम पोलिसांच्या पथकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने परिसरात सापळा रचला. रात्रीच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.धाराशिव व पुणे जिल्ह्यांत विविध गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेल्या सचिन उर्फ भैय्या जानकर याच्याविरुद्ध धाराशिव व पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये वाकड पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये मारहाणीचा, दिघी पोलीस ठाण्यात २०२० मध्ये अपहरण व मारहाणीचा, भूम पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये मारहाण व दंगलसदृश प्रकाराचा, तसेच हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यांत शस्त्र अधिनियम व मुंबई पोलीस कायद्यांतर्गत गुन्ह्यांची नोंद आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा भूम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल मोहिते, पोलीस उपनिरीक्षक बर्डे, पोलीस अंमलदार अमोल कवडे व जयराम क्षीरसागर यांच्या पथकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली.
अटक आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











