दुष्काळ, नापिकी अन् कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणत शेतकऱ्यांचा ठिय्या
मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत व सुशिक्षित सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी; न्याय मिळेपर्यंत हटणार नसल्याचा आंदोलकांचा इशारा
धाराशिव | लोकविचार
जिल्ह्यातील भीषण दुष्काळ, सततची नापिकी आणि डोक्यावरील वाढत्या कर्जाच्या ओझ्याला कंटाळून खानापूर (, ता. धाराशिव) येथील दयानंद संताराम राठोड (वय ३४) या अल्पभूधारक शेतकऱ्याने गुरुवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, संतप्त नातेवाईक, शेतकरी आणि ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणून ठिय्या आंदोलन सुरू केले.
‘शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत मिळालीच पाहिजे’, अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
दयानंद राठोड हे बंजारा समाजातील अल्पभूधारक शेतकरी असून ऊसतोड कामगार म्हणूनही काम करीत होते. यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने उत्पन्नाचा मार्ग बंद झाला होता. दुसरीकडे साखर कारखान्याची उचल आणि मित्रपरिवाराकडून घेतलेल्या कर्जाचा बोजा वाढतच होता. शेतीतून उत्पन्न नाही आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या राठोड यांनी गुरुवारी शेतातील पिकांची दुरवस्था पाहिल्यानंतर रात्री राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी बारा वर्षांचा मुलगा आणि दहा वर्षांची मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या वडिलांच्या अकाली निधनाने दोन चिमुकल्यांचे छत्र हरपले असून खानापूर गावावर शोककळा पसरली आहे.
मृतदेहासह जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्याशुक्रवारी सकाळी मृत शेतकऱ्याचे नातेवाईक, गावकरी आणि शेतकरी एकत्र आले. त्यांनी दयानंद राठोड यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, कुटुंबातील सुशिक्षित सदस्याला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, तसेच प्रशासनाने तातडीने पंचनामा करून शासनाकडे अहवाल सादर करावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.
मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठेवून शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मदत मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच आनंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत असताना आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रशासनाकडून मागण्यांबाबत लेखी अहवाल आणि ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईक व शेतकऱ्यांनी घेतला. या घटनेमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











