धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;
धाराशिव | लोकविचार
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. सन २०२६ च्या खरीप हंगामातील Trigger-9 (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केला आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाला आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार खरीप हंगामातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. Trigger-9 (प्रथम कळ) लागू झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे कृषी आयुक्तांच्या अहवालातून निदर्शनास आल्यानंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे.शेतकऱ्यांसाठी १२ उपाययोजना व सवलतीदुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांसाठी शासनाने विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती यांचा समावेश आहे.याशिवाय कृषी पंपाच्या वीज बिलामध्ये सवलत, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता देऊन अधिकाधिक कामे सुरू करणे, आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, तसेच टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करण्याची तरतूद करण्यात आली आहे.शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजूर व इतर कष्टकरी वर्गाला अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी व्यवस्था करण्याबरोबरच जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे आणि जलसंधारणाची कामे सुरू करण्याचे निर्देशही शासन निर्णयात देण्यात आले आहेत.
पीक परिस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशदुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सुरू करावी, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे तसेच जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पीक परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनास तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांतील पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. सोयाबीनसह खरीप पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्याने शासनाच्या विविध सवलती आणि उपाययोजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागाला दिलासा मिळणार असून, आता संबंधित यंत्रणांकडून या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











