नळदुर्गमध्ये पोलिसांशी हुज्जत घालीत हातभट्टी दारूविरोधातील कारवाईला विरोध; शिवसेना नेते कचरु सगटसह 14 जणांवर गुन्हा दाखल
पोलिसांशी धक्काबुक्की, धमकी दिल्याचा आरोप — कचरु सगट यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे, हद्दपारीची कारवाई झाल्याची माहिती
धाराशिव लोकविचार
हातभट्टी दारूविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या नळदुर्ग पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शिवसेना नेते कचरु मल्हारी सगट यांच्यासह अनेक जणांविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांशी धक्काबुक्की करून धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे काटगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुदर्शन व्यंकट घुले हे इतर कर्मचाऱ्यांसह अवैधरित्या मिळून आलेल्या हातभट्टी दारूवर कारवाई करण्यासाठी शासकीय कर्तव्य बजावत होते. यावेळी कचरु मल्हारी सगट, शशिकांत देडे, नगीना सोमनाथ कांबळे, मंगलाबाई रामकृष्ण कांबळे तसेच इतर १० जण, सर्व रा. काटगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव, यांनी कारवाईला विरोध केल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.
या वेळी संबंधितांनी पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून धक्काबुक्की केली तसेच धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुदर्शन घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 221, 224, 126(2), 118(1), 351(2), 189(2), 190 आणि 191(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कचरु सगट यांच्याविरोधात यापूर्वीही कारवायांची नोंददरम्यान, कचरु मल्हारी सगट यांच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल झाल्याची माहिती असून, त्यांच्यावर पूर्वी हद्दपारीची कारवाईदेखील करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्याच्या गुन्ह्यामुळे त्यांच्या विरोधातील पोलिस कारवाईचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
हातभट्टी दारूविरोधातील कारवाईदरम्यानच पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाकडे पोलिस प्रशासन गांभीर्याने पाहत आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपींची भूमिका काय होती, कारवाईला नेमका विरोध कशासाठी करण्यात आला आणि पोलिसांशी झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा पुढील तपास काय निष्पन्न करतो, याकडे आता लक्ष लागले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.
Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786











