चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
धाराशिव लोकविचार
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एका वाहनचोराला ताब्यात घेत त्याच्याकडून तब्बल १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. या मोटारसायकली धाराशिवसह औसा आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या आदेशानुसार २४ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व पथक जिल्ह्यातील दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी अण्णाभाऊ साठे चौक परिसरात एक व्यक्ती चोरीची मोटारसायकल बाळगून असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी परमेश्वर उर्फ सुरेश चंदर काळे (वय ४०, रा. जुना बस डेपो जवळ, पारधी पिढी, धाराशिव) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीच्या मोटारसायकली लपवून ठेवल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी त्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता एकूण चार मोटारसायकली मिळून आल्या. गुन्हे अभिलेख तपासल्यानंतर या मोटारसायकली आनंदनगर, धाराशिव ग्रामीण, औसा आणि कर्जत पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे समोर आले.
पोलिसांनी आरोपीसह चार मोटारसायकली ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे तसेच पोलीस हवालदार समाधान वाघमारे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, म. पो. ह. शोभा बांगर, प्रकाश, चापोका विनायक दहिहांडे व शेरखाने यांच्या पथकाने केली.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











