कळंब ड्रग्ज प्रकरण : नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ; आता खरे ग्राहक पोलिसांच्या जाळ्यात येणार का?
कळंब ड्रग्ज प्रकरण : एलसीबीने पर्दाफाश केला, पण स्थानिक पोलिसांचा तपास कुठे अडकला?; मुळापर्यंत पोहोचणार का?
नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ; सहा आरोपी अटकेत, तरी मूळ ड्रग्ज कोठून आला, ग्राहक कोण आणि आणखी पेडलर किती? याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात
कळंब | लोकविचार
धाराशिव जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईमुळे कळंब शहरातील एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज विक्रीचे जाळे उघडकीस आले आहे. या कारवाईत सुरुवातीला दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ११.२१ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढत गेली असून नगरसेवक मोसीन सलीम मिर्झासह आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, नगरसेवक मोसीन मिर्झा याला यापूर्वी २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज, २४ ऑगस्ट रोजी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत पुन्हा एका दिवसाची वाढ केली आहे. त्यामुळे या वाढीव कोठडीत तपासातून नेमके काय उलगडते, याकडे कळंबसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
एलसीबीच्या धडक कारवाईत एमडीचा पर्दाफाश
स्थानिक गुन्हे शाखेला धाराशिव जिल्ह्यात एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार ३ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली पथक कळंब परिसरात पेट्रोलिंग करत होते.
गोपनीय माहितीच्या आधारे कळंब-येरमाळा रोडवरील पायरा तलावाजवळ सापळा रचण्यात आला. या ठिकाणी निखिल जाधव आणि अरविंद कांबळे यांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. त्यांच्या ताब्यातून २९ पारदर्शक प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये ठेवलेले ११.२१ ग्रॅम पांढऱ्या रंगाचे स्फटिक स्वरूपातील एमडी (मेफेड्रोन) जप्त करण्यात आले.
या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२६/२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
एलसीबीने कारवाई केली; मग स्थानिक पोलिसांना माहिती का नव्हती?
या कारवाईनंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक महत्त्वाचा सवाल उपस्थित झाला आहे—कळंबसारख्या शहरात एमडी ड्रग्जची विक्री सुरू होती, तर स्थानिक पोलीस ठाण्याला याची माहिती का मिळाली नाही?
स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करून ड्रग्ज जप्त केले आणि आरोपींना अटक केली. मात्र स्थानिक पोलिसांच्या हद्दीत सुरू असलेल्या या गंभीर बेकायदेशीर व्यवहाराचा मागोवा स्थानिक यंत्रणेला का लागला नाही, हा तपासासोबतच आत्मपरीक्षणाचाही विषय ठरत आहे.
त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाच्या तपासासोबतच स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीचाही आढावा घ्यावा, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
गुन्हा दाखल होऊन दिवस उलटले; तपास मुळापर्यंत पोहोचला का?
या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन काही दिवसांचा कालावधी उलटला आहे. सहा आरोपी अटकेत असून नगरसेवक मोसीन मिर्झाच्या कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. मात्र तपासाच्या मुळाशी असलेले काही महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे चित्र आहे.
मूळ एमडी कुठून आला? तो कोणाकडून आणला जात होता? हा माल कोणाला विकला जात होता? कळंबमध्ये आणखी किती पेडलर सक्रिय आहेत? या व्यवहारामागील मुख्य सूत्रधार कोण आहे? आणि ड्रग्जचे खरे ग्राहक कोण आहेत?
या प्रश्नांची ठोस उत्तरे तपासातून समोर येणे अपेक्षित असताना तपासाची गती संथ असल्याची चर्चा कळंब शहरात सुरू आहे.
सहा आरोपी अटकेत; ग्राहक आणि मुख्य सूत्रधारांचा शोध कधी?
आतापर्यंत सहा आरोपींना अटक झाल्याचे समोर आले आहे. मात्र ड्रग्जची विक्री करणाऱ्यांपर्यंत कारवाई पोहोचल्यानंतर आता ग्राहक, स्थानिक संपर्क आणि आर्थिक व्यवहारांची साखळी शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ड्रग्जचे जाळे केवळ विक्रेत्यांपुरते मर्यादित नसते. पुरवठादार, पेडलर, ग्राहक आणि त्यामागील मुख्य सूत्रधार अशी संपूर्ण साखळी उघड होणे आवश्यक आहे. त्यामुळे तपास यंत्रणा या सर्व घटकांपर्यंत पोहोचते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तपासाच्या दिशेवरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तर्कवितर्क
एलसीबीला गोपनीय माहिती मिळते, कारवाई होते, एमडी जप्त होते आणि त्यानंतर आरोपी अटक होतात; मात्र स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या या व्यवहाराची माहिती आधी का मिळाली नाही, हा प्रश्न कायम आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास वेगाने पुढे जाऊन मूळ पुरवठादार, ग्राहक आणि संपूर्ण नेटवर्कपर्यंत पोहोचणे अपेक्षित असताना तपास नेमका किती पुढे गेला आहे, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे.
तपास यंत्रणा नेमकी कोणत्या दिशेने काम करत आहे? आणखी कोणाला अटक होणार आहे? आणि या प्रकरणाचा अंतिम तपास कुठपर्यंत पोहोचणार? या प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांनाच द्यावी लागणार आहेत.
वाढीव पोलीस कोठडीत काय उलगडणार?
नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एका दिवसाची वाढ झाल्याने तपास यंत्रणेला चौकशीसाठी आणखी वेळ मिळाला आहे. या काळात एमडीचा पुरवठा कुठून होत होता, व्यवहार कोणामार्फत होत होते, आणखी कोण पेडलर आहेत आणि ग्राहकांचे नेटवर्क किती मोठे आहे, याबाबत महत्त्वाची माहिती समोर येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मात्र या वाढीव कोठडीचा उपयोग केवळ चौकशीपुरता न राहता संपूर्ण ड्रग्ज साखळीचा छडा लावण्यासाठी होणार का, हा प्रश्न आहे.
मोठे रॅकेट उघड होणार का?
सुरुवातीला ११.२१ ग्रॅम एमडी जप्त झाल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढली आणि सहा आरोपी अटकेत आले. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या पुरवठ्याचे मोठे नेटवर्क उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र केवळ पेडलरना अटक करून तपास पूर्ण होणार नाही. मुख्य पुरवठादार, आर्थिक व्यवहार करणारे, ग्राहकांची साखळी तसेच या नेटवर्कला मदत करणारे घटक असल्यास त्यांच्यापर्यंत तपास पोहोचणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
एसपी रितू खोखर आता स्वतः लक्ष घालणार का?
कळंब शहरातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवायचे असेल तर या प्रकरणाचा तपास केवळ काही आरोपींच्या अटकेपुरता मर्यादित राहता कामा नये.
पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्वतः लक्ष घालून कळंब शहरातील ड्रग्ज माफियांचे जाळे मुळासकट उखडून टाकणार का? ड्रग्जचा मूळ पुरवठादार, पेडलर, ग्राहक आणि मुख्य सूत्रधार यांना गजाआड करण्यासाठी कठोर कारवाई करणार का?
याकडे आता कळंबसह संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
एलसीबीच्या कारवाईचे कौतुक; आता पुढच्या तपासाची प्रतीक्षा
धाराशिव जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्याला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने केलेली कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून एमडी जप्त करणे आणि त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढवणे, ही कारवाई उल्लेखनीय आहे.
मात्र आता या तपासाची खरी कसोटी आहे. पेंडलरपासून पुढे जाऊन ड्रग्जचे खरे ग्राहक, मुख्य पुरवठादार आणि संपूर्ण नेटवर्क पोलिसांच्या जाळ्यात येणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कळंब ड्रग्ज प्रकरणामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर उपस्थित झालेले प्रश्नही गंभीर आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक तपास करून अमली पदार्थांच्या संपूर्ण साखळीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
लोकविचार — सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक : अमजद सय्यद | 083900 88786











