लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी; मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेला मिळाले बुलंद नेतृत्व
लातूर लोकविचार
महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या (आर.टी.ओ) राज्याध्यक्षपदी लातूर येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक तथा कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उमेश सांगळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे लातूर विभागासह संपूर्ण राज्यातील कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लातूर येथे झालेल्या संघटनेच्या आमसभेत राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस तथा समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर, मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, कोषाध्यक्ष नितीन नागरे, कार्याध्यक्ष जगदीश कांदे आणि सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांच्या उपस्थितीत उमेश सांगळे यांच्या राज्याध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली.
यावेळी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.संघटनेच्या कामासाठी अहोरात्र झटणारे, सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी वरिष्ठ स्तरापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणारे नेतृत्व म्हणून उमेश सांगळे यांची ओळख आहे. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे कर्मचारी वर्गामध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदराची भावना आहे.
राज्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संघटनेच्या बळकटीकरणासह कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या निवडीमुळे लातूर विभागाचा गौरव वाढला असून राज्यभरातील कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











