कळंब ड्रग्ज प्रकरणात भाजप नगरसेवकांचे गंभीर आरोप स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल!
कळंब | लोकविचार विशेष प्रतिनिधी
कळंब शहरातील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा ‘लोकविचार’ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाचे कळंब शहरातील नगरसेवक शितल रामचंद्र चोंदे यांनी धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत कळंबमधील एमडी ड्रग्ज (अमली पदार्थ) कारवाईत कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
नगरसेवक चोंदे यांनी पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनानुसार, ५ ऑगस्ट रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने कळंब शहरात एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले होते. मात्र चौघांपैकी केवळ दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला, तर अन्य दोघांना कोणत्या कारणास्तव सोडण्यात आले आणि त्यांची वाहनेही का सोडण्यात आली, याचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान राजकीय हस्तक्षेप अथवा आर्थिक देवाणघेवाणीमुळे काही व्यक्तींना सोडण्यात आले का, असा संशयही निवेदनात व्यक्त करण्यात आला असून, त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.
एमडी ड्रग्जसारख्या गंभीर प्रकरणात कारवाई होऊन काही दिवस उलटले तरी पुरवठ्याची पुढील साखळी, मुख्य सूत्रधार आणि ड्रग्जचा स्रोत यांचा तपास नेमका कुठपर्यंत पोहोचला, असा सवालही उपस्थित झाला आहे. “चार जण ताब्यात घेतल्यानंतर दोघांवरच गुन्हा का? उर्वरित दोघांना कोणत्या आधारावर सोडण्यात आले?” या प्रश्नाचे उत्तर पोलिस प्रशासनाने स्पष्टपणे द्यावे, अशी मागणी चोंदे यांनी केली आहे.
या प्रकरणातील आणखी गंभीर मुद्दा म्हणजे आरोपी पोलीस ठाण्यात असताना त्यांना भेटण्यासाठी काही व्यक्तींना परवानगी कोणी दिली, याबाबतही चौकशीची मागणी करण्यात आली आहे. संबंधित पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये या हालचालींची नोंद असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला असून, ४ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट या कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज तातडीने जतन करण्याची मागणी नगरसेवक चोंदे यांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे न ठेवता वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवावा, तसेच ताब्यात घेतलेल्या चारही व्यक्तींची भूमिका, जप्तीची प्रक्रिया, वाहन सोडण्याचे कारण आणि ड्रग्ज पुरवठ्याची संपूर्ण साखळी यांची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, धाराशिव शहरातील वादग्रस्त ठरलेले तत्कालीन पोलीस निरीक्षकांची काही महिन्यांतच मुख्यालयात बदली झाल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा कळंब पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. आता कळंबमधील या गंभीर ड्रग्ज प्रकरणातील कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मात्र याबाबतही अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक आहे.
नगरसेवक शितल चोंदे यांनी कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा तसेच कळंब शहरवासीयांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
कळंब शहरात एमडी ड्रग्जचा वाढता धोका लक्षात घेता केवळ दोन आरोपींवर कारवाई करून प्रकरण संपविण्याऐवजी या अमली पदार्थांच्या पुरवठ्याची संपूर्ण साखळी उघडकीस आणणे गरजेचे आहे.
त्यामुळे आता पोलीस अधीक्षक या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन सीसीटीव्ही फुटेज, ताब्यात घेतलेल्या चारही व्यक्तींची चौकशी, जप्तीची प्रक्रिया आणि तपासाची दिशा याबाबत स्वतंत्र चौकशी करणार का, तसेच दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, याकडे कळंबकरांचे लक्ष लागले आहे.
‘लोकविचार’चा पाठपुरावा सुरूच — कळंब ड्रग्ज प्रकरणातील सत्य आणि संपूर्ण साखळी समोर येईपर्यंत प्रश्न विचारले जात राहणार.
लोकविचार — सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक : अमजद सय्यद 8390088786

