ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचे वाहनतळ अस्वच्छतेच्या विळख्यात!
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी; कचरा कुंड्या आणि सूचना फलक लावण्याची मागणी
नळदुर्ग, प्रतिनिधी : अझहर शेख
जागतिक वारसा स्थळाच्या दर्जासाठी प्रयत्न सुरू असलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याच्या परिसरातील वाहनतळ सध्या अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, किल्ल्याच्या सौंदर्याला देखील बाधा पोहोचत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी येथील सुजाण नागरिक अझहर रब्बानी शेख यांनी एका स्मरणपत्राद्वारे नळदुर्ग नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.नळदुर्ग भुईकोट किल्ला पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी भेट देतात. मात्र, वाहनतळ परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने पर्यटकांना नाहक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, पंधरा दिवसांपूर्वी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी किल्ला परिसराला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी न.प. प्रशासनाला स्वच्छतेबाबत व वाहनतळ फलक लावण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रशासनाने या सूचनांकडे साफ दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.यापूर्वी २५ मे २०२६ रोजी छायाचित्रांसह निवेदन देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने, पुन्हा एकदा ९ जून २०२६ रोजी नगरपरिषदेला स्मरणपत्र सादर करण्यात आले आहे. यामध्ये खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत,वाहनतळ परिसरात साचलेला कचरा व प्लास्टिक तात्काळ हटवून नियमित साफसफाई करावी. पर्यटकांच्या सुविधेसाठी परिसरात कचरापेट्यांची योग्य व्यवस्था करावी. वाहनतळ परिसरात नवीन आणि स्पष्ट दिसणारे माहिती व सूचना फलक लावावेत. नळदुर्ग किल्ल्याची ऐतिहासिक ओळख आणि पर्यटन महत्त्व लक्षात घेता, नगरपरिषद प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पहावे आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी पर्यटकांकडून आणि स्थानिक नागरिकांमधून होत आहे. जर प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर किल्ल्याची प्रतिमा मलिन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

