तहसीलदारांच्या नावाने सामान्य नागरिकांची फसवणूक करणारा ‘स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता’ जाळ्यात
धाराशिव लोकविचार
शासकीय काम करून देतो असे सांगत तहसीलदारांच्या नावाचा वापर करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारा कथित सामाजिक कार्यकर्ता अखेर जाळ्यात अडकला असून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धाराशिव तालुक्यातील मेंढा गावातील नागरिकांकडून रेशन कार्ड काढून देतो असे सांगत प्रत्येकी ५ हजार रुपये उकळल्याचा आरोप निखिल रणखांब (रा. कडदोरा, ता. उमरगा) याच्यावर आहे. शासकीय अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याचे भासवण्यासाठी तो जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या सत्कार कार्यक्रमातील फोटो दाखवत लोकांचा विश्वास संपादन करत असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रणखांब याने काही स्थानिक एजंटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांकडून पैसे गोळा केले. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना तसेच नवीन रेशन कार्ड काढून देण्याच्या नावाखाली ५ ते १० हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.
या प्रकरणाची तक्रार मानव अधिकार संघटनेचे धीरज ढोरमारे यांनी बेंबळी पोलिस ठाण्यात दिल्यानंतर महसूल विभागाला याची माहिती देण्यात आली. दरम्यान, रणखांब हा दुसऱ्या कामासाठी तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या कार्यालयात आला असताना त्याच्याबाबतची माहिती आधीच असल्याने तहसीलदारांनी तत्काळ त्याला ओळखून पोलिसांच्या ताब्यात दिले.
चौकशीदरम्यान तहसीलदारांशी अरेरावीची भाषा केल्याचेही समोर आले असून “जिल्हाधिकाऱ्यांशी माझे संबंध आहेत” असे सांगत त्याने दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. मात्र तहसीलदारांनी ठाम भूमिका घेत त्याला बेंबळी पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिस चौकशीत रणखांब याने काही गावकऱ्यांकडून पैसे घेतल्याची कबुली देत ते परत करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तसेच तो वैजिनाथ जावळे यांच्यासह काही एजंटांच्या मदतीने संगनमत करून हा प्रकार करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
या प्रकरणामुळे फसवणुकीचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता असून पुढील तपास महसूल व पोलिस विभागाकडून सुरू आहे. नागरिकांनी शासकीय कामांसाठी कोणालाही पैसे देऊ नयेत, तसेच अशा प्रकारची मागणी झाल्यास तातडीने तक्रार करावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786


