धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना गटनेतेपदी संदेश उर्फ विकी चव्हाण यांची एकमताने निवड
सावंत गट व माजी खासदार रवींद्र गायकवाड गट एकत्र आल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर दावा करणार!
धाराशिव | लोकमदत न्यूज
धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना गटनेतेपदी तेरखेडा जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले युवा सदस्य संदेश उर्फ विकी चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे जिल्हा परिषदेमधील शिवसेना गटाला नव्या नेतृत्वाची दिशा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने १५ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र अखेर सावंत गट आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड गट एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षांतर्गत झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ विकी चव्हाण यांची शिवसेना गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
या निवडीच्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, भूम-परंडा-वाशीचे आमदार व माजी मंत्री तानाजीराव सावंत, माजी खासदार रवींद्र गायकवाड, शिवसेना संपर्कप्रमुख व माजी आमदार राजन साळवी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांकडून विकी चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, जिल्हा परिषदेत पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी ते काम करतील, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

