गौरी आणि कालिका कला केंद्रांचे परवाने रद्द – जिल्हाधिकाऱ्यांचा कठोर निर्णय, नियमभंगावर प्रशासनाचा बडगा
धाराशिव दि.१७ (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील नाचगाण्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या असभ्य आणि नियमभंग करणाऱ्या कला केंद्रांवर अखेर प्रशासनाचा बडगा ओढण्यात आला आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दोन कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यात वडगाव (ता. कळंब) येथील गौरी सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र आणि परसंबा (ता. कळंब) येथील कालिका लोकनाट्य कला केंद्र या दोन्ही केंद्रांचा समावेश आहे. संबंधित केंद्रांनी परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून सामाजिक दृष्ट्या अनुचित आणि असभ्य कार्यक्रम आयोजित केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी कळंब यांनी सादर केलेल्या अहवालात नियमभंगाचे गंभीर प्रकार स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ परवाने रद्द करून दोन्ही केंद्रांवरील सर्व प्रकारचे कार्यक्रम तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच धाराशिव आणि कळंब येथील संबंधित पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेशांची अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी पुजार यांनी या निर्णयाद्वारे स्पष्ट इशारा दिला आहे की, “जिल्ह्यात कोणतेही कला केंद्र सामाजिक मूल्यांच्या विरोधात किंवा नियमभंग करून चालवले जाणार नाही. अशा केंद्रांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.” अलीकडच्या काळात जिल्ह्यातील काही तथाकथित लोकनाट्य कला केंद्रांच्या आडून अनुचित कार्यक्रम होत असल्याच्या तक्रारींवरून प्रशासनाने दाखवलेली ही कडक भूमिका लक्षवेधी ठरत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786






