एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश; दिवाळीपूर्वी वेतन देण्याचे आदेश!
८३ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतन वितरणासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या एसटी प्रशासनाला सूचना
मुंबई | लोकविचार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) सुमारे ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणपणे दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान अदा केले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वीच वेतन मिळणे आवश्यक आहे. दिवाळीच्या काळात कुटुंबीयांसाठी कपडे, फराळ, घरगुती वस्तूंची खरेदी तसेच इतर खर्चांचे नियोजन करता यावे, यासाठी वेळेत वेतन मिळणे महत्त्वाचे असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
वेतनासाठी निधी उपलब्ध करण्याचे निर्देशदिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाच्या अर्थ व नियोजन विभागाने तातडीने शासनाकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेले अनुदान तसेच मागील महिन्यातील विविध प्रवासी सवलत योजनांच्या प्रतिपूर्तीपोटी शासनाकडून मिळणारी प्रलंबित रक्कम वेळेत उपलब्ध करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासही सांगण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांच्या आनंदाला प्राधान्यएसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडू नये, यासाठी प्रशासनाने या विषयाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी समन्वय साधून वेतन वितरणाचे योग्य नियोजन करावे आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या हातात पगार पडेल, या दृष्टीने दक्षता घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या भूमिकेमुळे एसटी महामंडळातील हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळण्याबाबत दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786










