धाराशिव शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ; एसपी मॅडम सांगा, हे फेल्युअर कोणाचे?
वाहतूक शाखा नेमके करते काय? शहरवासीयांचा संतप्त सवाल; चौकाचौकांत कोंडी, कर्मचारी मात्र गायब..
धाराशिव लोकविचार
धाराशिव शहरातील वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बट्ट्याबोळ उडाला असून शहर वाहतूक शाखा नेमकी कुठे आणि कोणासाठी काम करते, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, अव्यवस्थित पार्किंग, अवजड वाहनांची मुक्त संचार व्यवस्था आणि वाहतूक कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत (सेंटर बिल्डिंग) चौक, बार्शी नाका जिजाऊ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मध्यवर्ती बसस्थानकासमोरील परिसर, जिल्हा न्यायालय चौक, समर्थ नगरकडे जाणारा मार्ग, देशपांडे स्टँड, माऊली चौक तसेच काळा मारुती चौक या भागांत दिवसभर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. मात्र या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचारी कार्यरत असल्याचे क्वचितच दिसून येत असली तरी ते कुठे वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पुढे सरसावल्याची दिसत नसल्याचा नागरिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा न्यायालय चौक ते समर्थ नगर मार्गावर अक्षरशः दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. नागरिकांना अनेक तास वाहनांच्या रांगेत अडकून राहावे लागत असताना वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिसत नसल्याची तक्रार आहे.
यामुळेच आता नागरिक थेट पोलीस अधीक्षकांनाच प्रश्न विचारत आहेत. “एसपी मॅडम, आपल्या मुख्यालय असलेल्या शहरातच जर वाहतूक व्यवस्था कोलमडत असेल, तर हे फेल्युअर नेमके कोणाचे?” असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असतानाही त्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. तसेच अवैध प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. वाहतूक शाखा वाहतूक नियोजनापेक्षा इतर बाबींमध्ये अधिक व्यस्त असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
ग्रामीण भागातून मजुरीसाठी किंवा भाजीपाला विक्रीसाठी शहरात येणाऱ्या गोरगरीब नागरिकांवर मात्र ऑनलाइन दंडाची कारवाई झटपट होत असल्याचे चित्र आहे. परंतु प्रभावशाली आणि धनदांडग्या वाहनचालकांवर त्याच पद्धतीने कारवाई होत नसल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक नियमांची अंमलबजावणी सर्वांसाठी समान आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
काही नागरिकांनी तर वाहन पुढे गेल्यानंतर पाठीमागून फोटो काढून ऑनलाइन दंड आकारण्याच्या पद्धतीवरही नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष वाहतूक सुरळीत करण्याऐवजी केवळ दंडात्मक कारवाईची आकडेवारी वाढवून मोठी कामगिरी केल्याचा आव आणला जात असल्याचा आरोप होत आहे.
वाहतूक शाखेचे मूळ काम म्हणजे वर्दळीचे ठिकाण आणि चौकांमधील वाहतूक कोंडी कमी करणे, नियमभंग रोखणे आणि नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे. मात्र सध्या शहरात दिसणारे वास्तव याच्या नेमके उलट असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
शहरातील वाढत्या वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी वाहतूक शाखेच्या कार्यपद्धतीची गंभीर दखल घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. नियुक्त कर्मचारी प्रत्यक्ष ड्युटीवर आहेत का, वाहतूक नियंत्रणासाठी कोणती उपाययोजना केली जात आहे आणि प्रमुख चौकांतील कोंडी दूर करण्यासाठी कोणती कार्यवाही केली जाणार आहे, याचे उत्तर आता शहरवासीयांना अपेक्षित आहे.
वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रस्त झालेल्या नागरिकांचा एकच प्रश्न आहे – केवळ ऑनलाइन दंड वसूल करणे हेच वाहतूक शाखेचे काम आहे का, की धाराशिवकरांना सुरळीत वाहतूक व्यवस्था देण्याची जबाबदारीही प्रशासन स्वीकारणार आहे?
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











