लेखी आश्वासनानंतर ‘माऊली’ प्रकरणातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; ३१ ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
‘माऊली’ गैरव्यवहार प्रकरणात प्रशासनाची अखेर दखल; तक्रारदार सुरज माळी यांचा आक्रमक पवित्रा कायम!
धाराशिव | लोकविचार
‘माऊली इंटरप्राईजेस’ आणि ‘माऊली टूर अँड ट्रॅव्हल्स’च्या नावाने कथित बोगस देयके काढून शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी अखेर प्रशासनाला दखल घ्यावी लागली आहे. या प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी तक्रारदार सुरज महादेव माळी यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. तसेच १५ ऑगस्ट रोजी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता. मात्र प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन ३१ ऑगस्टपर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा धाराशिव दौरा निश्चित असताना प्रशासनाची अचानक धावपळ सुरू झाली. उपोषण आणि आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराशी चर्चा करून चौकशी पूर्ण करण्यासाठी मुदत मागितली. त्यानंतर मध्यम प्रकल्प विभाग, धाराशिवचे कार्यकारी अभियंता डी. व्ही. खट्टे यांनी लेखी पत्र देत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत या प्रकरणाचा विस्तृत अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
तक्रारदार सुरज माळी यांनी यापूर्वी ३ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर १० ऑगस्ट रोजी स्मरणपत्र देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तक्रारीत ‘माऊली इंटरप्राईजेस’च्या नावाने प्रिंटर टोनर खरेदीसाठी लाखो रुपयांची देयके काढण्यात आल्याचा तसेच ‘माऊली टूर अँड ट्रॅव्हल्स’च्या नावाने वाहन वापराच्या संशयास्पद नोंदींवर आधारित आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बनावट स्वाक्षऱ्या, शिक्के, चुकीच्या वाहन नोंदी आणि शासकीय निधीच्या गैरव्यवहाराचे आरोपही करण्यात आले आहेत.
मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतरही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत माळी यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. आंदोलन तीव्र होत असताना आणि आत्मदहनाचा इशारा कायम असताना प्रशासनाने लेखी निवेदन देत चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले.
कार्यकारी अभियंता डी. व्ही. खट्टे यांनी दिलेल्या पत्रात, तक्रारीतील सर्व मुद्द्यांचा विस्ताराने अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून तो ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाईल, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत आमरण उपोषण व आत्मदहनासारख्या टोकाच्या मार्गाचा अवलंब करू नये, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
या लेखी आश्वासनानंतर सुरज माळी यांनी आपले आमरण उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा ३१ ऑगस्टपर्यंत तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई झाली नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, ‘माऊली’ प्रकरणातील कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते, चौकशी अहवालात काय निष्पन्न होते आणि दोषींवर गुन्हे दाखल होतात का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ३१ ऑगस्ट ही तारीख प्रशासनासाठी निर्णायक ठरणार असून, त्यानंतर या प्रकरणाला आणखी मोठे राजकीय आणि सामाजिक स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकविचार “सत्य शोधून लिहिण्याची ताकद” संपादक : अमजद सय्यद | 083900 88786











