“आळणीच्या माजी सरपंचावर गंभीर आरोपांचा भडीमार; अवैध धंदे, मातंग समाजाला राजकीयदृष्ट्या संपविण्याचा कट आणि विद्यार्थिनींचा वापर केल्याचा आरोप, लहुजी शक्ती सेनेचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन”
धाराशिव लोकविचार
आळणी येथील माजी सरपंच प्रमोद नेताजी वीर यांच्याविरोधात लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संबंधित माजी सरपंचांवर अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणे, मातंग समाजाला राजकीयदृष्ट्या संपविण्याचा प्रयत्न करणे, समाजात जातीय तेढ निर्माण करणे, खोटी माहिती पसरवून मातंग समाजाची बदनामी करणे तसेच शाळेतील विद्यार्थिनींचा वापर करून प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केले.
आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, दिनांक 31 जुलै 2026 रोजी आळणी येथील ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या सरपंचपदाच्या राजकारणातून मातंग समाजाला दूर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वातावरण निर्माण करण्यात आले. मातंग समाजातील नेतृत्व कमकुवत करण्यासाठी आणि समाजाला राजकीयदृष्ट्या वंचित ठेवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या निवेदनानुसार, संबंधित माजी सरपंच कथित “पिंजरा कला केंद्र” चालवत असून त्या कथित कला केंद्रामुळे जिल्ह्यातील अनेक युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, अनेक कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाले आणि अनेक संसार विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, या कथित अवैध व्यवसायामुळे अनेक युवक चुकीच्या मार्गाला लागले असून अनेक कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक नुकसान झाले आहे.
याशिवाय संबंधित माजी सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचाही दावा आंदोलनकर्त्यांनी केला. अशा सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनकर्त्यांनी आणखी आरोप केला की, पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी शाळेतील विद्यार्थिनींना आणण्यात आले. त्या विद्यार्थिनींना संबंधित घटना, कथित छेडछाड किंवा त्या संदर्भातील वस्तुस्थितीची कोणतीही माहिती नसतानाही त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच संबंधित शाळेच्या प्रशासनावर दबाव टाकून विद्यार्थिनींना आंदोलनात आणण्यात आल्याचा दावा करत, त्या शाळेतील शिक्षक व प्रशासनाचीही निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, मातंग समाजातील तरुणांना गुंड प्रवृत्तीचे असल्याचे खोटे चित्र उभे करून समाजाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला. सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करून त्यांना गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. समाजात जातीय तेढ निर्माण करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत असल्याने संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी असा आरोपही केला की, मातंग समाजातील काही नेत्यांवर कारवाई करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील एका प्रमुख लोकप्रतिनिधीकडून पोलीस प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यात आला. संबंधित समाजनेत्यांवर तातडीने कारवाई करून हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाने स्पष्ट इशारा दिला की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित माजी सरपंच प्रमोद वीर तसेच दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा मातंग समाजाच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
आज दिनांक एक ऑगस्ट रोजी सर्व आंदोलन करताना भारतीय जनता पक्षाचे तुळजापूर विधानसभेचे आमदार राहणार जगदीश सिंह पाटील यांचे भेट घेऊन संबंधित घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आदेश देऊन आम्हाला न्याय देण्याची मागणी यावेळी समक्ष भेटून केली
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


