महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त भवानी चौकात अभिवादन; २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा संकल्प!
धाराशिव | लोकविचार
धाराशिव शहरातील भवानी चौक येथे महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आणि नगरसेविका संगीता अकोसकर यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महर्षी वाल्मिकी यांनी ‘रामायण’ या महान ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, आदर्श जीवनमूल्ये तसेच सत्य, धर्म आणि कर्तव्याचा संदेश समाजाला दिला. त्यांच्या विचारांचे स्मरण करून जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
डीजे आणि मिरवणुकीचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना मदतीचा हात
यंदा दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून डीजे आणि मिरवणुकीवरील अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी २०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती सौ. गोकर्णा कदम, सौ. मनीषा केंद्रे, माजी नगरसेवक बालाजी कोरे, नगरसेवक राहुल काकडे, सदानंद आकोसकर, धनंजय पाटील, नगरसेवक अक्षय ढोबळे, सभापती आकाश तावडे, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, दाजी अप्पा पवार, सभापती अभिजीत काकडे, नगरसेवक अभिजीत पतंगे, गोपाळ कदम, राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, उमेश चव्हाण आदी उपस्थित होते.
या जयंती कार्यक्रमाचे आयोजन सदानंद (भाऊ) आकोसकर मित्र परिवार आणि समस्त कोळी बांधव, सांजा रोड, भवानी चौक, धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले.











