बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून राजकीय आखाडा पेटला !
आनंद पाटलांनी किरण गायकवाड मा.आमदार यांना अंतर दाखवले
भाजप युवा नेते शरण पाटील यांच्या उपस्थितीने महायुती अभेद्य
भातागळी दि.७ (प्रतिनिधी) – शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख आनंद पाटील यांनी लोहारा तालुक्यातील भातागळी येथे शिवसेना पक्ष नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे आणि पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली “एकनाथ केसरी” बैलगाडा शर्यत यशस्वी पार पाडली. या माध्यमातून आनंद पाटील यांच्या मातोश्रींना जिल्हा परिषद सभापतीपदासाठी डावलणाऱ्या माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांना अंतर देऊन विशेष म्हणजे भाजपाचे युवा नेते शरण पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शर्यतीमुळे उमरगा व लोहारा तालुक्यात महायुती मजबूत असल्याचे दाखवून देत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यामुळे या भागात पुन्हा आनंद पाटलांच्या नावाची राजकीय पटलावर नव्याने चर्चा सुरु झाली आहे. निमित्त बैलगाडा शर्यतीचे असले तरी बैलगाडा आखाड्याच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने राजकीय वचपा काढण्याचा खरखुरा सत्तेच्या खुर्चीचा आखाडा पेटला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोहारा तालुक्यातील भातागळी येथे श्री शंभो महादेव यात्रेनिमित्त शिवसेना युवासेना धाराशिव लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील यांनी “एकनाथ केसरी बैलगाडा शर्यत” दि.७ एप्रिल रोजी आयोजित केली होती. मराठवाड्यातील पहिली आणि अत्यंत प्रतिष्ठेची ल महत्वाची असलेली ही शर्यत शर्यत अभूतपूर्व उत्साही वातावरणात शिस्तबद्ध नियोजनात आणि प्रचंड गर्दीमुळे ऐतिहासिक ठरली.
आखाडा कुठलाही असो मग तो बैलगाडा शर्यतीचा किंवा राजकारणाचा तेथे प्रचंड स्पर्धा ठरलेलीच असते. बैलगाडा शर्यतीत कोणता बैल विजयी होणार यासाठी जशा प्रेक्षकांच्या अशा उंचावलेल्या असतात. अगदी तशाच राजकारणात कोण माहीर ? याकडे देखील पाहिले जाते. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडणुकीसाठी खुद्द शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद पाटील यांच्या मातोश्रींना महिला व बाल कल्याण सभापती करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्ह्याचे आम्हीच नेते आहोत, आमच्या शिवाय पक्षाची गाडी हलवणार नाही अशा अविर्भावात असलेल्या गायकवाड व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आनंद पाटील यांच्या मातोश्रीला सभापती पदापासून वंचित ठेवण्याचे काम केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. मात्र, अशा कुरघोडीच्या राजकारणाकडे सपशेल दुर्लक्ष करीत आनंद पाटील यांनी ना. शिंदे यांची भेट देऊन पुन्हा नव्या जोमाने काम सुरू केले आहे. त्यांनी आपल्या जन्मभूमी असलेल्या भातागळी येथे पहिलीच मराठवाडा स्तरीय….एकनाथ केसरी बैलगाडा शर्यत…. यशस्वीरित्या आयोजित केली. या स्पर्धेत देखील अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तर या स्पर्धा प्रथमच होत असल्याने दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी व नागरिकांनी पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती.
मराठवाड्याच्या परंपरेला, शौर्याला आणि ग्रामीण संस्कृतीच्या वैभवाला साजेसा हा थरारक सोहळा प्रथमच लोहारा व उमरगा तालुकावासियांनी याच देही याच डोळी पाहिला. गावागावातून आलेल्या स्पर्धकांनी आणि हजारो प्रेक्षकांनी मैदान गजबजून गेले होते. जल्लोष, थरार आणि परंपरेचा अभिमान यांचा संगम या स्पर्धेत अनुभवायला मिळाला.
विशेष म्हणजे, या संपूर्ण आयोजनात युवकांचा उत्साह आणि सहभाग लक्षणीय ठरला.
युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून केवळ स्पर्धेचा आनंद घेतला नाही, तर नियोजन आणि व्यवस्थापनातही सक्रिय भूमिका बजावत कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.
या स्पर्धेत येण्याचा प्रथम मान भातागळी येथील आनंद पाटलाच्या दमदार बैलाने पटकावला आहे. या विजयाच्या माध्यमातून भातागळी गावच्या बैलाचा आणि गावचा तूरा मराठवाडाभर मिरविण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. त्यामुळे या अलौकिक कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गटांनी सरस व अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली. विजेत्यांना रोख बक्षिसांसह मानाची ढाल प्रदान करण्यात आली तर प्रत्येक गट विजेत्याला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
या भव्य आणि यशस्वी आयोजनामागे अनेक सहकाऱ्यांची मेहनत, ग्रामस्थांचे सहकार्य आणि सर्व स्तरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद महत्वाचा ठरला.
या स्पर्धेसाठी सर्व शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे या सोहळ्याची भव्यता अधिक वाढली.
या स्पर्धेने केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक आणि संघटनात्मक पातळीवरही एक सकारात्मक संदेश दिला. मराठवाड्याच्या ग्रामीण परंपरेला नवसंजीवनी देणारा आणि समाजाला एकत्र आणणारा हा सोहळा ठरला.
जनसेवेचे काम अविरतपणे आणि प्राधान्याने करणार – पाटील
दोन्ही तालुक्यातील सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहून, अशा प्रकारच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न कायम राहणार आहे. राजकारण हे क्षणिक असते, मात्र जनतेचे हित महत्वाचे असून त्याला यापुढे कायम प्राधान्य देणार आहे. पद असो किंवा नसो जनसेवा करण्याचे माझे काम अविरतपणे सुरु ठेवणार असल्याचे आश्वासन आनंद पाटील यांनी दिले.


