आंबेडकर पुतळ्यांच्या अवमानाविरुद्ध राऊत आक्रमक; प्रशासनाला इशारा – गुन्हे दाखल करा, अन्यथा आंदोलन
धाराशिव, दि. _ : जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांबाबत सातत्याने घडत असलेल्या अवमानकारक व बेकायदेशीर घटनांमुळे सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून, प्रशासनाची निष्क्रियता संशयास्पद असल्याचा थेट आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी केला आहे. दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मागील काही दिवसांत येडशी, कळंब तालुक्यातील मस्सा व शिराढोण येथे मध्यरात्री विनापरवानगी पुतळे बसविण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर वाशी येथील पारा चौकात डॉ. आंबेडकर यांचा पुतळा हटवून दुसरा पुतळा बसविण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच भूम येथे आंबेडकर पुतळ्यासाठी आरक्षित जागेवर दुसरा पुतळा बसविण्याचा प्रयत्न झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली आहे.
या घटनांवर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी स्पष्ट केले की, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी संपूर्ण समाजात अपार आदर आहे; मात्र त्यांच्या नावाचा आधार घेत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यांशी छेडछाड करणे हा अत्यंत घातक प्रकार असून, समाजात तेढ निर्माण करणारा आहे. काही शक्ती जाणीवपूर्वक सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
राऊत यांनी पुढे सांगितले की, काही व्यावसायिक पुतळा निर्माते व कारखानदार स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काही संघटनांना हाताशी धरून तरुणांना भडकवत आहेत. बेकायदेशीर पद्धतीने पुतळ्यांची विक्री व उभारणी करून समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा हा संघटित प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले.
या प्रकरणांमध्ये भारतीय दंड संहिता कलम 153(A), 295(A), 188 व 120(B) अंतर्गत गुन्हे दाखल करून संबंधितांना तात्काळ अटक करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा, 1951 तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
यासोबतच सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, वाशी येथील पारा चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्याची तात्काळ पुनर्स्थापना आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विशेष नियंत्रण पथक स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
“प्रशासनाने तात्काळ आणि ठोस कारवाई केली नाही, तर धाराशिव जिल्ह्यातील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. या अन्यायाविरोधात तीव्र व निर्णायक आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा देत राऊत यांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले.
