पाथरूड गल्लीतील पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांची धडक कारवाई लाखोंच्या मुद्देमालासह ९ जणांवर गुन्हा दाखल
धाराशिव | लोकमदत न्यूज
धाराशिव शहरातील सोलापूर रोडवरील पात्रुड गल्ली परिसरात सुरू असलेल्या तिरट (पत्त्यांच्या) जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करत २ लाख ५६ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ९ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत व धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत पात्रुड चौक परिसरातील एका घरात ‘तिरट’ नावाचा जुगार सुरू असून तेथे मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होत असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले.
त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली sdpo कार्यालयातील पोलीस कर्मचारी हुसेन सय्यद व ठाकूर यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्याशी संपर्क साधून त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आंबोरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहाळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल मिसाळ, पोलीस कर्मचारी कनामे, शेंडगे, भोसले, मामीलवार तसेच बीट मार्शल यांच्या समवेत संयुक्त पथक तयार करण्यात आले. रात्रीच्या सुमारास हे पथक कारवाईसाठी रवाना झाले.
दरम्यान, पात्रुड गल्ली येथील विजय मुकिंदा मुद्दे यांच्या राहत्या घरात काही जण गोलाकार बसून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहाळ यांनी दोन पंचदमक्ष कारवाई सुरुवात केली.
दिनांक ९ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संबंधित घरावर अचानक छापा टाकला. त्यावेळी घराच्या मागील खोलीत दोन गोलाकार वर्तुळात बसून काही जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी आपली ओळख सांगून पंचांच्या उपस्थितीत आरोपींना ताब्यात घेतले.
या कारवाईत विजय मुकिंदा मुद्दे (पात्रुड गल्ली), रफिक लाला शेख (खाजानगर), आमिर सत्तार डांगे (साईरामनगर), अनवर कबूला नाईकवाडी (रसूलपुरा), चंद्रकांत मुकिंदा मुद्दे (झोरे गल्ली), विजय श्रीमंत गायकवाड (क्रांती चौक), राजू चंद्रकांत मुद्दे (झोरे गल्ली), राजू बाबुराव कवळेकर (एस.टी. कॉलनी) व बलभीम जगन्नाथ जाधव (दारफळ) यांना जुगार खेळत असताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
छाप्यामध्ये जुगारासाठी वापरण्यात येणारे तिरटचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकल तसेच इतर साहित्य असा एकूण २ लाख ५६ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या विशेष पथकाने तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत असून शहरातील अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक वाढल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, शहरात चोरीछुपे सुरू असलेले जुगार व इतर अवैध धंद्यांवर अशीच कठोर कारवाई सुरू ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786
