धाराशिव स्थानिक पोलिसांच्या हलगर्जीमुळे बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारणाऱ्या भावाचा निर्दयी खून – कुटुंबीयांचा एसआयटी चौकशी व पुनर्वसनाचा इशारा
धाराशिव दि.२२(प्रतिनिधी):धाराशिव शहरात घडलेली ८ मे २०२५ रोजीची थरारक घटना मानवी मूल्यांना काळिमा फासणारी असून आपल्या बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या सोळा वर्षीय कुमार मारुती शिवाजी इटलकरचा गणेश किराणा स्टोअर समोर निर्घृण खून करण्यात आला. या घटनेत स्थानिक पोलिसांनी सुरुवातीपासूनच हलगर्जी व संगनमताची भूमिका घेत आरोपींना पाठीशी घातल्याचा गंभीर आरोप मृतकाचे वडील शिवाजी सीमाप्पा इटलकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.
मारुतीच्या बहिणीवर सतत छेडछाड करणाऱ्या सागर प्रवीण चौधरीला जाब विचारण्यासाठी गेलेल्या मारुतीवर प्रवीण सुभाष चौधरी, किशोर सुभाष चौधरी, अंकुश सुभाष चौधरी, सागर सुभाष चौधरी, रणजीत सुभाष चौधरी, सिद्धनाथ सावंत तसेच दोन अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड व काठ्यांनी अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात मारुतीच्या अंगावर तीसहून अधिक गंभीर जखमा झाल्या. त्याच्यासोबत असलेल्या आकाश बोई व समर्थ दत्ता जाधव यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी हल्लेखोरांनी रस्त्यावरील दिवे बंद केल्याच गंभीर आरोप देखील इटलकर यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
गंभीर जखमी अवस्थेत मारुतीला प्रथम धाराशिवमधील केके हॉस्पिटल, नंतर शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने तब्बल २८ तास वाया गेले. अखेरीस सोलापूर येथील गंगामाई हॉस्पिटल व त्यानंतर शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीपासूनच निष्काळजीपणा दाखवला असून फिर्यादीचे जबाब नीट नोंदवले गेले नाहीत. आरोपपत्र अपूर्ण ठेवून अनेक महत्त्वाचे तपशील वगळण्यात आले. प्रमुख आरोपी अद्यापही फरार असून, त्यांना राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मारुतीच्या हत्येनंतर वडार समाज व विविध संघटनांच्या वतीने १३ जून २०२५ रोजी धाराशिव शहरात प्रचंड धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतरही पोलिसांनी अपेक्षित कारवाई न केल्याने १४ जुलै २०२५ रोजी मृतकाचे वडील शिवाजी इटलकर यांनी कुटुंबासह आमरण उपोषणाला सुरुवात केली. त्या वेळी पोलिसांनी तातडीची कारवाई करण्याचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्यास भाग पाडले. मात्र नंतर पोलिसांनी पूर्णतः दिशाभूल केली आणि आरोपींना वाचवण्यासाठी संगनमताने हलगर्जी दाखवली, अशी खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर कुटुंबीयांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून सखोल चौकशी करणे, मृतक हा घरातील एकुलता एक मुलगा असल्याने शासनाने कुटुंबाचे पुनर्वसन करून मुलीला शासकीय नोकरी देणे, मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे, हलगर्जी करणाऱ्या धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मोबाईल सीडीआर तपासणे, आरोपींना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेत्याची चौकशी करणे, कुटुंबास तातडीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देणे व खटला विशेष न्यायालयात चालवण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करणे या मागण्या विशेषत्वाने आहेत.
या मागण्या मान्य न झाल्यास आजपासून २२ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह बेमुदत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे. या घटनेमुळे धाराशिव शहरात संतापाची लाट उसळली असून, स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कडक कारवाई न झाल्यास प्रशासनावरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786
