जीवनज्योत महिला ग्राम संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; ‘लखपती दीदी’ होण्यासाठी महिलांना मार्गदर्शन
पोहणेर लोकविचार
दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी पोहणेर येथील सभागृहात जीवनज्योत महिला ग्राम संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला ग्राम संघाच्या माध्यमातून ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर राष्ट्रगीत, वंदे मातरम्, तिरंगा प्रतिज्ञा तसेच गावामध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी तालुका व्यवस्थापक संस्था बांधणी व क्षमता बांधणी कुलकर्णी यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याचा योग्य वापर करून स्वतःचे व्यवसाय उभे करण्याचे आवाहन केले. तसेच सुरू केलेल्या व्यवसायामध्ये सातत्याने वाढ करून महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे मार्गदर्शन केले.
तालुका व्यवस्थापक एमटीएस शेरखाने यांनी उमेद अभियानाची संकल्पना स्पष्ट केली. गावातील अभियानापासून वंचित असलेल्या सर्व कुटुंबांना तसेच सर्व महिलांना बचत गटांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ‘मुख्यमंत्री लखपती दीदी’ अभियानाबाबतही चर्चा करण्यात आली. गावातील सर्व महिला लखपती दीदी होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रभाग समन्वयक श्रीमती शीतल गोरे यांनी महिला बचत गटांची बांधणी, प्राप्त कर्जाचा योग्य विनियोग, गटांचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे तसेच सर्व गट ऑनलाइन करण्याबाबत मार्गदर्शन केले.प्रभाग व्यवस्थापक श्रीमती अलका मोरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना गावातील एकूण बचत गट, प्राप्त निधी आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या गटांची माहिती दिली.
सीआरपी स्वाती मोरे यांनी मागील वर्षात करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेत आगामी वर्षाचे नियोजन सभेसमोर मांडले.ग्रामसेविका सौ. शिंदे यांनी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
तसेच सुपरवायझर सौ. ढाकणे यांनी बाल विकास विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजनांची व विषयांची माहिती उपस्थित महिलांना दिली.या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन जीवनज्योत महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा शशिकला धावारे व सचिव मोहिनी धावारे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अलका मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. शीतल गोरे यांनी मानले. विविध विषयांवर मार्गदर्शन, चर्चा आणि आगामी नियोजनासह जीवनज्योत महिला ग्राम संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीरित्या संपन्न झाली.
Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786











