३२ घरफोडीचे गुन्हे उघड; ४५ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत! सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडून सन्मानित
धाराशिव | लोकविचार
धाराशिव पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत एकूण ३२ गुन्हे उघडकीस आणत ४५ लाख ३५ हजार रुपयांचा सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांचा १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला.
आनंदनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक १५०/२०२६ मधील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. वारंवार घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके नियुक्त करण्यात आली होती.
पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींकडून विविध ठिकाणी केलेल्या घरफोड्यांची माहिती मिळाली. त्यातून तब्बल ३२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.
या कारवाईबद्दल पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यास मदत होणार असून, नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











