एसटी महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेला बळकटी; आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांची मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारीपदी नियुक्ती
मुंबई लोकविचार
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एसटी महामंडळातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी पदाबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत शासनाने उप-महानिरीक्षक दर्जाच्या आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांची एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे एसटी महामंडळाच्या सुरक्षा यंत्रणेला नवे बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.प्रियंका नारनवरे या अनुभवी, कर्तव्यदक्ष आणि प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडलेल्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.
पोलीस प्रशासनातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ आता एसटी महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेला, दक्षता विभागाला तसेच प्रवासी सुरक्षेसाठी होणार आहे.एसटी महामंडळात प्रवाशांची सुरक्षा, कर्मचाऱ्यांचे संरक्षण, बसस्थानकांवरील शिस्त आणि गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
अनेक वर्षांपासून हे पद रिक्त असल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर परिणाम होत असल्याची चर्चा होती. आता या नियुक्तीमुळे महामंडळाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळातील विविध प्रशासकीय आणि सुरक्षा विषयक सुधारणा राबविण्यास सुरुवात केली असून, भविष्यात प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत या नियुक्तीतून मिळत आहेत.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

